In the news
कूपर कॉर्पोरेशनकडून साताऱ्यात अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांटचे उद्घाटन, कंपनीचा पहिला ट्रॅक्टर देखील लाँच
कूपर कॉर्पोरेशनने आपला पहिला वाहिला ट्रॅक्टर लाँच करत साताऱ्यात अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांटचे उद्घाटन केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
जागतिक पातळीवर इंजिन, इंजिनचे स्पेअर पार्टस आणि जनरेटर्सचे मॅन्युफॅक्चरर असलेल्या कूपर कॉर्पोरेशनने 1 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील साताऱ्यात अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात कूपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीज हा कंपनीचा पहिला ट्रॅक्टर लाँच करण्यात आला. उत्कृष्ट परफॉरमन्स, इंधन कार्यक्षमता आणि अभिनव इंजिनिअरिंगच्या माध्यमातून शेतीमध्ये क्रांती घडविण्याच्या दृष्टीने हा ट्रॅक्टर निर्मित करण्यात आला आहे.
उद्घाटन समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आमदार महेश शिंदे, रिकार्डो यूकेचे ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डायरेक्टर क्लाइव्ह बॅगनॉल यांसारखे मान्यवरही उपस्थित होते.
अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांट आणि कूपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीजचे लाँचिंग हे कृषी क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण आणि उच्च कार्यक्षमतेची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा कूपर कॉर्पोरेशनचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे. कठीण भूभाग आणि अवजड कामांसाठी तयार करण्यात आलेल्या कूपर ट्रॅक्टरमध्ये इंधन कार्यक्षमता, अर्गोनॉमिक / कार्यानुरुप डिझाईन आणि कमी देखभाल खर्च यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
जगभरातील प्रसिद्ध अभियांत्रिकी कंपन्यांच्या सहकार्याने या ट्रॅक्टरचे डिझाईन आणि निर्मिती करण्यात आलेली आहे. डिझाईनसाठी मॅग्ना स्टेयर, इंजिन डेव्हलपमेंटसाठी रिकार्डो यूके, ट्रान्समिशनसाठी करारो इंडिया आणि हायड्रॉलिक्ससाठी मिता इंडिया यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे कूपर ट्रॅक्टर इंधन, सर्विस आणि ऑपरेशनच्या खर्चात बचत करत उत्तम परफॉरमन्स देण्याचे वचन देते. फरोख एन. कूपर हे पहिले असे कृषी पदवीधर आहेत, जे या कारखान्याचे मालक आहेत आणि त्यांची स्वतःची शेतीही आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ट्रॅक्टरकडून नेमकी काय अपेक्षा असते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून कूपर ट्रॅक्टर विकसित करण्यात आला आहे.
या नव्या उपक्रमाबद्दलचे व्हिजन स्पष्ट करताना कूपर कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक फरोख एन. कूपर म्हणाले, “आज कूपर कॉर्पोरेशनसाठी ऐतिहासिक क्षण आहे, कारण आमचा पहिला ट्रॅक्टर लाँच करत आम्ही कृषी क्षेत्रात पदार्पण करत आहोत. कूपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीज ही अनेक वर्षांचे संशोधन, नवकल्पना आणि भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. जागतिक तंत्रज्ञान आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन तयार केलेला हा ट्रॅक्टर उत्पादकता वाढवण्यासाठी, कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि कठीण शेती परिस्थितीत टिकाव धरण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. साताऱ्याशी घट्ट नाळ असलेली कंपनी म्हणून आम्ही भारतीय कृषी क्षेत्राच्या वाढीस आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीस हातभार लावत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.”
ट्रॅक्टरविषयी माहिती
कूपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीज आधुनिक शेतीच्या विविध गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल-क्लच ट्रान्समिशन, पॉवर स्टियरिंग आणि अवघ्या 3 मीटरची वळण क्षमता यांसारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे तो सहज चालवता येतो आणि उत्तम कामगिरी बजावतो. या ट्रॅक्टरमध्ये इंधन कार्यक्षमता असलेले ३ सिलेंडर – ४ व्हॉल्व्ह पर सिलेंडर इंजिन, बेड प्लेट, एचएलए, बॉश फ्युएल सिस्टम, सिरेमिक-कोटेड रिंग्ज, पिस्टन कूलिंग जेट आणि दीर्घकाळ टिकणारा कॉम्पॅक्टेड ग्राफाईट सिलेंडर हेड आहे. हा प्रकार पहिल्यांदाच वापरण्यात आला असून, त्याच्या टिकाऊपणासाठी आणि कमी देखभालीसाठी ओळखला जातो.
कठीण आणि आव्हानात्मक परिस्थिती सहज हाताळण्यासाठी हा ट्रॅक्टर तयार करण्यात आला आहे. वजन वाहून नेण्याची उत्कृष्ट क्षमता आणि कोणत्याही भूभागावर सहज चालण्याची क्षमता यामुळे हा अत्यंत प्रभावी ठरतो.